९८८१४२६१४७ | [email protected]

मंदिराचा परिपूर्ण इतिहास

न्यासाच्या अधिकारात खालील देवतांची मंदिरे आहेत|
आद्य श्री भद्रकाली व श्री गणपती व श्री दत्तात्रय मंदिर व शनिमंदिर वरील सर्व मंदिरात स्वतंत्र पुजारी यांची नेमणूक केलेली आहे| सदरचे पुजारी देवापुढे आलेले ,उत्पन्न व त्यासाठी ठेवलेले दानपेटीतील उत्पन्न घेतात| न्यासाला सदरचे उत्पन्नाचा कुठलाही भाग मिळत नाही| सर्व मंदिरातील दिवाबत्ती व देखभाल याचा खर्च व शासकीय कर न्यास करते| न्यासाला सरकारी व वार्षिक अनुदान दिवाबत्ती रू|२२९ दोनशे एकोणतीस मिळतात| न्यासाच्या जागेत पूर्व परंपरा भाडेकरी अत्यंत अल्पदरात राहतात व त्यांचे उत्पन्नात न्यासाचा खर्च भागविला जातो|
खालील उत्सव साजरे केले जातात|
१| चैत्रशुध्द प्रतिपदेला पुण्याहवाचन करून पंचांग पुजन करून पंचागाचे वाचन केले जाते| त्याच प्रमाणे स्थानिक ब्राम्हणवृंदामार्फत सप्तशती पाठाचे वाचन केले जाते| त्या प्रित्यर्थ ब्राम्हणवृंदाचा योग्य तो सन्मान करून दूध पेढे पंचांग यांचे वाटप केले जाते|
२| रोज सप्तशतीचे पाठाचे वाचन देवीपुढे सकाळी ८ ते ९:३० या वेळेत न्यासातर्फे केले जाते|
३| रोज दुपारी महिलांचा भजनाचा कार्यक्रम असतो|
४| रोज संध्याकाळी देवी पुराणाचे वाचन केले जाते|
५| रोज रात्री कथा कीर्तनाचा कार्यक्रम असतो|
६| रोज देवतांची पुजा सकाळी होते व आरती सकाळ संध्याकाळी होते|
७| नवरात्रीचे नऊ दिवस उत्सव करण्यांत येतो| रोज सायंकाळी विद्वान ब्राम्हणांमार्फत मंत्र जागरणाचा कार्यक्रम होतो.
व तसेच अष्टमीचा होम हवन व देवीपुढे घागरी फुंकणे गावातील महिला करतात|अश्विन पोर्णिमेला नवचंडीयाग करण्यात येतो|
८| न्यासातर्फे प्राच्यविद्यापिठ मार्फत संस्कॄत शिष्यवॄत्ती व गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ साजरा करण्यात येतो| या यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना संस्कॄत विषयामध्ये ९० टक्के व पुढील मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना व तसेच विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांना संस्कॄत मध्ये ९५ टक्क्यांपुढे मार्क असल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवॄत्ती देन्यात येते| याच प्रसंगी संस्कॄत भाषेचे विशेष अध्यापन केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यांत येतो| शिष्यवॄत्तीसाठी न्यासातर्फे खर्च करण्यांत येतो|
९| गणपती उत्सवाचे आयोजन गणपती उत्सवांत करून एक दिवस गणेश याग करण्यांत येतो|
१०|दत्तजयंतीचे वेळी सात दिवस दत्ताचे गुरूचरित्र पारायण करून दत्तजन्माचा उत्सव साजरा करण्यांत येतो| संस्थेची जागा व मंदिरे जिर्ण झाले मुळे त्यांचा जिर्णोध्दार करणे वगैरे कार्यक्रम न्यासाच्या विचाराधिन आहे| त्याप्रमाणे अंदाजपत्रक व नकाशाचे काम झाले असून शासकीय परवानगी व आर्थिक बाब या करिता काम थांबले आहे|
११| जुने भाडेकरी काढून त्याजागी संस्कॄत निवासी कार्यशाला सुरू करणेबाबत काम चालू आहे|
१२| न्यासा मार्फत जुन्या मंदिरांचा जिर्णोध्दार करून नविन मंदिर सुसज्ज बांधून तीन दिवसांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यांत आला|

भद्रकाली देवीस किंवा मंदिरास आपणांस वस्तू किंवा देणगी द्यावयाची असल्यांस विश्वस्तांकडे देणगी देऊन पावती लगेच घ्यावी व सहकार्य करावे|जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते तू जयन्ती विजया मंगल काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा ही सर्व तुझीच निरनिराळी रूपे असून त्या सर्व रूपांना माझा नमस्कार असो| इ.स.वी सन ११ च्या शतकात नासिकची उत्पत्ती सांगतांना नऊ टेकडयांवर जे शहर वसलेले आहे ते नासिखा| पुढे नासिखा या शब्दाचा अपभ्रंश होऊन नासिक हे नाव झाले| या नऊ टेकडयांवर देवींचे स्थान आहेत|

याच नासिक शहरास कॄतयुगांत पद्मनगर त्रेतायुगांत त्रिकंटक द्वापारयुगांत जनस्थान व कलीयुगांत नासिक म्हणतात| याच नासिकला जनस्थान व चिबकस्थान असेही म्हणतात|
किं वर्णयाम तव रूपमचिन्त्यमेतत् | किं च्यतिवीर्यमसुरक्षयकारि भूरि || किं चाहवेषु चरिता नि तवादभुतानि | सर्वेषु देव्यसुरदेव गणादिकेषु ||
हे देवी तुझ्या अनाकलनीय रूप गुणांचे मी वर्णन तरी कसे करू: रणक्षेत्रांतील तुझे कार्य देव आणि दैत्यांच्या साक्षीनेच घडलेले आहे| तुझ्या अद्भूत पराक्रमांची लीला वर्णन करायला माझ्याकडील शब्दही अपुरे पडतात| पूर्वी राजा दक्ष प्रजापतीने मोठया यज्ञााचे आयोजन केले होते|या यज्ञामध्ये भगवान शंकर सोडून सर्व देव ऋषी मुनी यक्ष गंधर्व व सर्व मंडलिक राजे यांना आमंत्रण दिले गेले| पण भगवान शंकर हे त्याचे जावर्इ असूनही त्याला आमंत्रण दिले नाही| त्यावेळी देवी सतीने शंकरांना विनंती केली|माझ्या वडिलांचे घरी यज्ञ आहे आपण जाऊ| तेव्हा शंकरांनी सांगितले आपणास बोलाविल्याशिवाय कोणाकडेही जाऊ नये|मात्र सतीच्या हट्टामुळे तिला जाण्यास परवानगी दिली| सती जेव्हा दक्षप्रजापतीच्या घरी गेली तेव्हा सर्वांनी तिची व शंकराची निंदा केली| सतीने सांगितले
यो निन्दति महादेवं निन्द्यमानं शॄणोति वा | तावुभौ नरकं यातो यावच्चंद्रदिवाकरौ ||
जो शंकराची निंदा करतो वा ऐकतो तो जो पर्यंत सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत नरकात रहातो| निंदा श्रवण केल्याने सतीने आपल्या देहाचे यज्ञकुंडात समर्पण केले| त्यावेळी शिवगणांनी यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरूवात केली| तेव्हा भॄगुमुनीने अपहता असुरा|, रक्षांसि वेदिषदा| ही आहुति दिल्याने अनेक ऋभु नामक प्रबलविर प्रकट झाले| त्यांचे व शिवगणांचे युध्द झाले|
भगवान शंकर तेथे आले व यज्ञकुंडातील सतीचा जळता देह घेवून कैलासाकडे निघाले असता बाकी सर्व देव मुनी ऋषी घाबरले| त्यांनी भगवान विष्णूंना विनंती केली की आता शंकरांना शांत आपणच करू शकता| भगवान विष्णुंनी आपले सुदर्शन चक्र सोडले व त्या चक्राने सतीच्या देहाचे अनेक तुकडे झाले व ते सर्व भाग या भूमंडलावर पडले| त्यापैकी हनुवटीचा भाग हा नाशिक येथे पडला| हनुवटीलाच चिबक असे म्हणतात| म्हणून नासिकला चिबक किंवा जनस्थान असे म्हणतात| तेच स्थान भद्रकाली होय|


भद्रं करोति इति भद्रकाली | भद्र म्हणजे कल्याण| करोति म्हणजे करणारी| याचा अर्थ जी नेहमीच कल्याण करते ती भद्रकाली| पूर्वी इस्लामी राज्यकर्त्यांच्या राजवटीत देवदेवतांच्या मुर्तींची विटंबना होत होती| त्यावेळी मुर्तीची विटंबना मोडतोड किंवा ती भंग होऊ नये म्हणून गावांतील स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन त्यावेळचे सरदार श्री.पटवर्धन यांना मंदिरासाठी जागा द्यावी म्हणून विनंती केली| सरदारांनी मोठेपणाने तिवंधा चौकाजवळील जागा मंदिरासाठी दिली व सदर जागेवर श्री.पटवर्धन सरदार व श्री.दीक्षित यांनी भद्रकालीचे मंदिर बांधले| सदर मंदिराचे बांधकाम सन १७९० मध्ये पूर्ण झाले|भद्रकाली देवीचे मंदिर मोठे प्रशस्त असून वरती दोन मजले बांधलेले आहेत पण मंदिरावर कळस नाही| कारण त्यावेळी मंदिरे व देवतांची विटंबना इस्लामी राजवटीत होत होत्या| म्हणूनच मंदिरावर कळस नाही|श्री भद्रकाली देविची मुर्ती साधारणता, १५”पंधरा इंच उंचीची असून मुर्ती पंचधातुची आहे| तिला १८ हात आहेत| त्या प्रत्येक हातात शस्त्र व अस्त्रे आहेत| ती अशी शुल चक्र शंख शक्ती धनुष्य बाण घंटा दंड पाश कमंडलू त्रिशुल माळा तलवार तेज ढाल चाप इत्यादि आयुधे आहेत|
श्री भद्रकाली देवी मंदिराचे मार्फत नासिक प्राच्य विद्यापिठाची स्थापना करण्यात आलेली असून गुरू परंपरेनुसार वेद वेदाध्यानही चालते| येथे विद्यारथ्यानाच राहण्याची मोफत सुविधा असून विद्यार्थी येथे राहतात| मंदिराचे जवळपास सर्व ब्राम्हण वर्गाची ३५० घरे असून विद्यार्थी तेथे माधुकरी मागून आणतात व देवीस नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून ती माधुकरी ते ग्रहण करतात|


मंदिरात रोज देवीची त्रिकाल पूजा व आरती होते| विश्वकल्याणासाठी देवीपुढे रोज सप्तशतीचे पाठ होतात| विशेषता: चैत्र शुध्द प्रतिपदेस म्हणजे गुढीपाडव्यास नासिक मधील सर्व ब्राम्हणवृंद भद्रकाली देवीपुढे सप्तशतीचे पाठ विश्वकल्याणासाठी करतात| मंदिराची रोज साफसफार्इ संरक्षण व पाविञ्य ठेवले जाते| अश्विन शुध्द प्रतिपदेपासून अश्विन पोर्णिमेपर्यंत नवरात्र उत्सव केला जातो| नवरात्रात रोज रात्री नाशिकमधील विद्वान व व्यासंगी पंडीत ब्राम्हण एकत्र येऊन संहिता पारायण करतात व त्यानंतर सप्तशतीचे पुराण प्रवचन येथे होते| मंदिरात रोज भजन व किर्तन होते| त्याचपमाणे रोज संध्याकाळी पुराण प्रवचन होते| सदर पुराण वाचण्याचा मान हा नाशिक येथील वेद शास्त्र संपन्न कै.नारायणशास्त्री सितारामशास्त्री गायधनी यांच्या घराण्याकडे असून त्यांच्या घराण्यास भद्रकालीचे पुराणिक ही पदवी बहाल करण्यात आली आहे| त्यांच्या वारसांनी आज ही परंपरा चालू ठेवलेली आहे| मंदिराचे व्यवस्थापन नाशिकमधील ब्राम्हण वर्गाकडून केले जाते| जसे देविस नैवेद्य दक्षिणा नंदादिपासाठी तेल इ| त्याचप्रमाणे वेळोवेळी भक्तांकडून मिळणारे धन व इतर साहित्य उपलब्धतेनुसार सर्व धार्मिक खर्च केला जातो| श्री भद्रकाली देवीची मुर्ती अत्यंत विलोभनीय असून भद्रकालीच्या दर्शनाने प्रत्येक भक्ताचे मन प्रसन्न होते| भक्तांनी भक्तीभावाने केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांची मनोकामना परिपूर्ण होते| म्हणूनच आजही देवीची प्रार्थना करतांना भक्त म्हणतात


नमस्ते अंबिके धाव, ,दु:ख मुक्त मला करी |
तने मने धने माते सुखी पूर्ण मला करी ||१||
शरणागत मी दिन माते भद्रकाली कॄपा करी |
षङगुणी भाग्यवान भक्त सत्वरी मजला करी ||२||
धर्मवान यशवान श्रीमान ज्ञान वैराग्यवान करी |
ऐश्वर्यवान तुझा भक्त अंबिके मजला करी ||३||
म्हणूनच मार्कण्डेय मुनी उल्लेख करतात|||
देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम् |
प्राप्नोति पुरूषो नित्यं महामाया प्रसादत||१||
देहपतना नंतर या भक्तांना स्वर्गात मानाचे स्थान मिळून महामायेच्या प्रसादाने दैवदुर्लभ मोक्ष लाभेल व तिचे नाव चिरंतन स्मरणांत राहील|
इति प्रसदिता देवैर्जगतोडर्थे तथाऽऽत्मन,| |
तथेत्युक्त्या भद्रकाली बभूवान्तार्हिता नॄप ||१|| धृ
देवतांनी जेव्हा आपल्या व जगाच्या कल्याणासाठी भद्रकालीची प्रार्थना केली व देवीस प्रसन्न करून संतुष्ट केले| त्यावेळी भद्रकाली तथास्तु म्हणून अंर्तधान पावली|

मंदिराचा पत्ता


श्री भद्रकाली देवी मंदिर (शनि मंदिर ) सा. न्यास

र. नं. अे. ८, भद्रकाली रोड, नाशिक - ४२२ ००१, महाराष्ट्र, भारत

४२२ ००१

ॐ भद्रं करोति इति भद्रकाली ॐ